गुरुवार, १ ऑक्टोबर, २०१५

(हा लेख 23 ऑगस्ट 2013 ला लिहिलेला आहे. फक्त टायपिंग करण्याची स्वतःची सुविधा नसल्यामुळे मित्राच्या ऑफिसमध्ये बसून थोडा थोडा type करून आज टाकला आहे . )
----------------------------------------------------------------------------------------------
               तुमच्या आमच्या मनातील देवाबद्दलच्या श्रद्धेला अंधश्रद्धेचे स्वरूप केव्हा प्राप्त झाले ? जेव्हा आपल्याला देवाची भीती घातली गेली ;आपल्याला सांगितले गेले कि , आपण जर आमुक आमक्या गोष्टी नाही केल्या तर आपल्यावर देवाची गैरमर्जी होईल मित्रहो ,देव कधी कुणाला आपली मर्जी शेअर करतो का / सांगतो का ? आम्ही श्रद्धाळू आहोत ,भोळे आहोत या गोष्टीचा फायदा आजपर्यंत ( जे सनातनी , धार्मिक विद्वेष पसरवणारे ) ह्या लोकांनी घेतला . होय , आमचा धर्म आम्हाला प्रिय आहेच …! अगदी १०० % !!! आम्हाला सर्व धर्मांबद्दल सहिष्णुता आहे . कारण माझा हिंदु धर्म मला कधीच विद्वेष शिकवत नाही . दुसर्या व्यक्तीचा तिरस्कार आणि त्याही पुढे जाऊन खून करण्यासारखी शिकवण तर अजिबात देत नाही !
मला एक गोष्ट फार खटकली ; डॉ . नरेंद्र दाभोलकर किंवा कॉ . गोविंद पानसरे किंवा चार्वाकांपासून ते तुकोबापर्यंत पुरोगामी चळवळीतील लोकांनी आपले आयुष्य वेचलं आपल्या धर्मातील वाईट चालीरीती , प्रथा ,परंपरांना काढून टाकण्यासाठी ………खरं म्हणजे हे समाज शुद्धीचं काम होतं . हे आपले जीवनमान उंचावण्यासाठी अतिशय उपयुक्त होते . मात्र असे धर्मभ्रष्ट ( सनातन , आर .एस,एस . , बजरंग दल , विहिंप किंवा तत्सम ) आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करतात किंवा आक्षेपार्ह बोलतात त्यांना काय हवंय नेमकं ? त्यांना धर्म त्यांच्या ताब्यात हवाय म्हणजे ते ह्या धर्माशी कसेही खेळू शकतील ! आपण त्यांचे अंधानुकरण करतो हे अतिशय चुकीचे आहे .
मी काही तथाकथित धर्मप्रेमी संस्थांच्या वर्तमानपत्रांमध्ये , इंटर्नेट साईटवर जेव्हा नजर टाकतो तेव्हा अक्षरशः जीव विटून जातो . मला राग येतो …अरे धर्म माझा आणि मला शहाणपणा तुम्ही शिकवायचा ………? का ? आम्हाला काही काळात नाही ? धर्म आमचा आणि मक्तेदारी तुमची ? कोण आहात कोण तुम्ही ? आज माझा शिवाजी राजा असता तर तुम्हाला सुळावर चढवले असते त्यांनी … धर्माचा वापर स्वार्थासाठी केला म्हणून !
आता पुन्हा मला प्रश्न पडला कि कि डॉ . दाभोळकरांना माझं भलं व्हावसं स्वप्न होतं कि ह्या तथाकथित सनातनी धार्मिक लोकांना ? मग मला उत्तर सापडले …… ! माझा धर्म कोणताही असो;जात कोणतीही असो दाभोळकरांनी आम्हाला सांगितले कि कुठल्याही प्रकारच्या काळ्या जादूला घाबरून जायचं नाही किंवा कुठलीच वाईट गोष्ट/ अन्याय धार्मिकतेच्या नावावर सहन करायची नाही . डॉ . दाभोळकर जिथे पोहोचू शकले नाहीत तिथे मात्र कुणी तरी भोंदू बुवा ,बाबा आजही स्त्रिया , अल्पवयीन मुली व भोळ्या भाबड्या लोकांचे शोषण करीतच आहे . डॉ . दाभोळकरांनी " जादूटोणा विरोधी विधेयक " आणायला लावून ह्या बुवा , बाबांची दुकाने बंद केली . व यांना आश्रय देणाऱ्या संस्था संघटनांची लाच / बिदागी बंद झाली . कारण कुठल्याही संरक्षणाशिवाय ज्याला कायद्याने बंदी आहे अशा गोष्टी बिनदिक्कत चालूच शकत नाहीत !
सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला अधोरेखित करायचा आहे - माझ्या धर्माच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर हे लोक मला का भडकावताहेत ? हे स्वतः कधी का उतरत नाहीत रस्त्यावर ? यांना का वाटत नाही आमच्याइतका धर्माचा अभिमान ? यांचा धर्माभिमान ढोंगी आहे का ? कि हा फक्त राजकीय सत्ता ताब्यात यावी म्हणून आमच्या भावनांशी खेळलेला क्रूर खेळ आहे ?
डॉ . दाभोळकरांनी देवाची पूजा करू नका असं कधीच सांगितलं नाही . उलट त्यांनी सांगितलं कि देवाची भक्ती निर्भेसळ आणि पवित्र होण्यासाठी मध्यस्थांची आणि त्यांच्या ईष्टमित्रांची गरज असत नाही . खरं म्हणजे आपल्या सगळ्या शंका दुरुस्त होण्यासाठी दाभोलकरांसारख्या माणसांनी प्रयत्न केले . खरं म्हणजे मी हि खूप भ्रमात होतो मीही माझ्या धर्माकडे कळपातूनच ' सनातन व तत्सम ' जसे शिकवतील त्याच पद्धतीने पहात होतो . पण आता आपले डोळे उघडले आहेत . ह्यांनी आपला तुकोबा , छ . शिवाजी आणि असे कित्येक हिरे मरवण्यासाठी प्रयत्न केले आणि मारले सुद्धा ! दाभोळकरांनी मला वाईट प्रथांना न घाबरता मला श्रद्धा जोपासता यावी यासाठी प्रयत्न केले . याउलट मी जोपासत असलेल्या श्रद्धेच भूत करून माझ्याच मानेवर बसवण्याचा प्रयत्न काही ' सनातनि निधार्मिक ( म्हणजे ज्यांना कधी धर्म कळलाच नाही असे ते !) लोकांनी केला आहे . या लोकांना मी माझी श्रद्धा कधीच 'हायज्याक' करू दिली नाही ; आणि इथून पुढे तर ती कधीच देणार नाही ! आणि माझा धर्म हिंसेच्या माझ्या माध्यमातून जगापुढे आणणाऱ्या प्रवृत्तींना आपण सर्वांनी एक होऊन प्रत्त्युत्तर का द्यायला नको ? नाहीतर एक दिवस असा येईल कि आपला धर्म अशा थोर माणसांच्या खुनांच्या बळावर उभा आहे असा सा-या जगाचा समज होईल !
आपला धर्म ( मग तो कोणताही असो ) , आपली श्रद्धा जोपासण्यासाठी आपण जरूर प्रयत्न करूया ; पण तो कसा जोपासावा , श्रद्धा कशी असावी हे असल्या सनातनी ( ज्यांना धर्म कधी कळलाच नाही ) अशांनी आम्हांला सांगण्याची गरज का भासावी ? आम्ही इतके निर्बुद्ध आणि नासमज आणि यांत्रिक आहोत का कि ; आम्हाला देवाशी शुद्ध नातं जोडण्यासाठी ह्या सनातन्यांच्या भूलथापांना बळी पडावे लागते ! यांचा धूर्त धार्मिक राजकारण राजकारण खेळण्याचा कुटील डाव आपण हाणून पडायला हवा ! डॉ . दाभोळकरांची ओळख करून देताना ' सनातन ' वाल्यांनी ते हिंदू धर्म विरोधी आहेत अशी करून दिली . हा संभ्रम जाणीवपूर्वक पेरण्यात ते काही प्रमाणात यशस्वि झाले . परंतु आता वस्तुस्थिती माझ्या ध्यानात आली आहे ; दाभोळकरसुद्धा हिंदूच होते कि ! त्यांनी कधीच सांगितले नाही कि हिंदू धर्म आणि देव मानणे वाईट आहे म्हणून ! उलट त्यांनी आपली धार्मिक भावना वापरून आपल्याला लुबाडणार्यांना छाप बसावा म्हणून प्रयत्न केले . आमची लुबाडणूक थांबली तर ' त्यांची ' दुकाने बंद होतील या भीतीतून त्यांनी दाभोल्करांचा खून केला .
खरं म्हणजे आपल्या मनात राग उत्पन्न व्हावा असं काहीच दाभोलकर बोलले नाहीत व त्यांनी तसं काही केलंहि नाही ! अतिशय विवेकवादी , सामातावादि आणि विज्ञानवादी मानसिकतेतून त्यांचं व्यक्तिमत्व उभा राहिलं होतं . शांततामय मार्गाने समाजातील अनिष्ट व वाईट रूढींवर त्यांनी हल्ला केला . पण रोज आपल्याला कुणीतरी सांगत आहे कि हे हिंदू द्वेषी आहेत म्हणून ! पण आता आपल्याला कळलं पाहिजे कि आपण आपली श्रद्धा आणि धर्म ह्या हिंस्त्र दलालांच्या ताब्यात देणार कि दूर ठेवणार त्यांना आपल्या धर्मापासून !
डॉ . दाभोळकरांचा खून करणारे खरं म्हणजे कुठल्याच जाती धर्माचे असू नयेत असं मला वाटतं कधी कधी . कारण ते उद्या सापडतील तेव्हा त्यांच्या नावांवरून ते अमुक जातीचा , धर्माचा म्हणून त्याच्या जाती धर्मावर बट्टा लावण्याचे कृत्य आपल्याकडून होईल . कारण कुठलीच जात किंवा धर्म आपली शिकवण हिंसेच्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न करत नाही . तर त्या कारस्थानामागे जो मेंदू काम करत असेल किंवा असे मेंदू तयार करणाऱ्या कारखान्यांना सरकारने ( जर त्यांची मानसिकता असेल तर …. ) टाळे ठोकले पाहिजेत !
' सनातन प्रभात 'या वृत्तपत्राचे काम ' धर्मनिरपेक्षता ' या लोकशाहीच्या मूळ गाभ्यापासून लोकांना भुलवून बाजूला करणे आणि समाजविघातक अंधश्रद्धा भोळ्या सर्वसामान्य लोकांच्या माथी मारणे हे आहे ! खरं म्हणजे यातून त्यांना समाज तोडण्याचं जे ढोंगी समाधान मिळत आहे ते एक न एक दिवस लयाला जाणार आहे . कारण , तुम्ही सदासर्वकाळ इथल्या सहिष्णू हिंदू समाजाला वेडे बनवू शकत नाही ! भारतीय राज्यघटना जी ' धर्मनिरपेक्षता ' सांगते ती आपल्या देशाला लागलेली कीड आहे असा प्रचार करणाऱ्या सनातनच्या वृत्तपत्र संपादकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आणि ' सनातन ' वर आतंकी समूह म्हणून बंदी का घालत नाही तेच कळत नाही ! विद्यार्थ्यांना नक्षलवादी ठरवून, खोटे आरोपी करून त्यांना तुरुंगात खितपत ठेवून आपला भ्रष्टाचारी बाणा टेचात मिरवणाऱ्या शासनाकडून या एका तरी चांगल्या धर्मनिरपेक्ष कृत्याची अपेक्षा आम्ही करायची का नाही ? ' सनातन ' वाले सा-या वृत्तपत्र व मिडीयाला धर्मद्रोही समजतो आणि स्वतःला मात्र हिंदू धर्मरक्षक ! अशा वेळी सनातन वाल्यांची फार कीव येते . कारण ज्या हिंदू धर्माच्या भांडवलावर हे आपली पोटे भरत आहेत आणि पैसा व प्रसिद्धी मिळवत आहेत ; तो नेमका कसा आहे , त्याची जीवनमूल्ये नेमकी कशी आहेत हेच त्यांना कळत नाही ! किंबहुना त्यांना ती माहित आहेत आणि माहित असूनही त्या मूल्यांपासून ते आपल्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत . मुळात दुसर्या धर्माच्या विद्वेषामध्ये माझ्या हिंदू धर्माचा विकास निश्चितच नाही .! हिंदू धर्म म्हणजे वैचारिक अथवा शारीरिक हिंसाचार अजिबात नाही . हिंदू धर्माचा जो विपरीत अर्थ सनातन व तत्सम वाले आपल्याला सांगत आहेत तो त्यांच्या प्रदूषित नजरेतून आलेला आहे . हिंदू धर्म कधीच या गोष्टीचं समर्थन करीत नाही कि दुसर्या धर्मांवर जहरी टीका करत नाही . माझ्या धर्माची मला दुसर्या धर्मांशी तुलना करण्याची गरजच काय ? त्यामुळे सनातनला माझा…… नाही आपला सल्ला आहे कि त्यांनी हिंदू धर्माचे ( त्यांच्या नजरेतले ) संकुचित रूप आम्हाला दाखवू नये , सांगू नये ! छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म इतका व्यापक केला कि इथल्या गैरहिंदू लोकांनासुद्धा कधीच वाटले नाही कि आपला दुसरा कुठलातरी धर्म आहे . मिळून मिसळून जगत होती सर्वधर्मीय रयत ! आजही कित्येक गावांमध्ये हिंदू - मुस्लिम- ख्रिश्चन हा भेद न कळण्याइतके लोक एकत्र जगत आहेत . सनातन प्रभात व काही ( स्वतःचा प्रदूषित दृष्टीकोन असणारे ) हिंदुत्ववादी पक्ष यांना हि गोष्ट चांगलीच माहित आहे कि हे दोन धर्मसमूह एकत्र आले कि आपल्याला किडके राजकारण करता येनार नाही ; म्हणून इंग्रजांनी जी ' फोडा आणि राज्य करा ' हि नीती वापरली तीच नीती आता हे वापरत आहेत ! पण हळूहळू आता हे सर्व हिंदू , मुस्लिम , ख्रिश्चन , शीख इ . सर्वांनाच कळून चुकले आहे कि कुठलाही कट्टर धर्मवादी विचार आपल्या धर्माच्या विकासाला पोषक नाही . त्यामुळे आता कुठल्याही कट्टर धर्मवादी पक्षांना , संघटनांना या निमित्ताने इथे सत्ता गाजवणे कठीण वाटू लागले आहे . त्यामुळे त्यांनी जे जे चांगले ते ते संपवण्याचा सपाटा लावला आहे . आणि त्यांचा हाहि प्रयत्न चालला आहे कि आमचे समर्थन मिळावे , आम्हाला वाटावे कि हेच आमच्या धर्माचे तारणहार आहेत ; आम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत कि आम्ही धरमासाठी हि कृत्ये करत आहोत . पण लबडांनो तुमचा डाव आता आमच्या लक्षात आला आहे …. ! आता इथे जोपासला जाईल माझ्या शिवाजी राजाचा धर्म …. व्यापक आणि समृद्ध ! तुमच्या ढोंगाला आता इथे थारा नाही !
------------------------------------------------------------------------------------------------------------------
                                                                                                                ( अमित प्रभा वसंत )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा